मुंबई -केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
- सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळा -
मुंबईत टिळक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, हेमंत ओगले, अमर खानापुरे, शिवानी वडेट्टीवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- 'बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल'
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असे आव्हान पटोले यांनी केले.
- काँग्रेस संधी देते - वडेट्टीवार