मुंबई - मुंबई महापालिकेने पाणी चोरी रोखण्यासाठी मागेल त्याला पाणी धोरण आखले आहे. या धोरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधीच भाजपाने या धोरणावर टीका केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी दोन ट्वीट केली असून त्याद्वारे त्यांनी या धोरणावर टीका केली आहे.
पालिकेचे पाणी धोरण - बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमधील सर्व निवासी नागरिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत धोरण" "Water for All Policy" तयार केले आहे. या सुधारित धोरणानुसार यापूर्वी वगळण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांना, निवासी जागांना व इमारतींना पाणीपुरवठा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नव्हता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याने उद्यापासून या धोरणाचा शुभारंभ केला जाणार आहे.
घरात नळ चोवीस तास आणि पाणी फक्त एक तास -आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या धोरणाचा शुभारंभ केला जाणार आहे. त्याआधी आशिष शेलार यांनी ट्विट करत, मुंबईकरांना गेल्या वचननाम्यात "वचन" दिले 24 तास पाणी....सध्या परिस्थिती अशी की, घरात नळ चोवीस तास आणि पाणी फक्त एक तास! मुंबईकर आता याबाबत प्रश्न विचारणार म्हणून नवे पॅकेज घोषीत केले..."सर्वांसाठी पाणी" वा! कितीही पावडर लावली तरी खोटेपणाचे व्रण लपणार नाहीत! असे ट्विट केले आहे.
कंत्राटदारासाठी समुद्राचे पाणी "गोड" -तर आणखी एक ट्विट करताना, सर्वांसाठी म्हणायचे आणि कोळीवाडे गावठाणांना सोईस्कर नियमात अडकवायचे.. सर्वांसाठी जाहीराती करणार आणि कागदावर अटींचे बंधारे बांधणार.. मुंबईकरांसाठी म्हणायचे आणि कंत्राटदारासाठी समुद्राचे पाणी "गोड"करायचे! मुंबईकर हो, पाणी इथेच मुरतेय तुमच्या पाण्यात षडयंत्र शिजतेय! असा आरोप शेलार यांनी केला आहे.