मुंबई - शहरातील कचऱ्याच्या मुद्दयावर पालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुंबईमधील सर्व नगरसेवकांच्या सूचना मांडायला दिल्या जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र अनेक नगरसेवकांना यावेळी बोलण्याची संधी मिळाली नसल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. इंदोरमध्ये भाजपची सत्ता असल्याने आमच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच पालिकेत लोकशाहीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरु आहे, असा आरोप भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केला आहे. तर ज्यांना बोलण्यास मिळाले नाही, त्यांना बोलण्याची संधी दिली जाईल असे उपमहापौर सुहास वाडकर यांनी सांगितले.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील स्वच्छ महापालिकेला केंद्र सरकारकडून पुरस्कार दिला जातो. गेली चार वर्ष इंदोर महापालिकेला प्रथम क्रमांक मिळत आहे. या शहराला मुंबईमधील महापौर, सभागृह नेते आणि नगरसेवकांनी भेट दिली. या भेटीनंतर कचरा व्यवस्थापनावर पालिकेची विशेष सभागृह आयोजित करण्याची मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली होती. त्यानुसार मुंबईमधील कचऱ्याच्या मुद्दयावर पालिकेचे विशेष सभागृह बोलावण्यात आले. यावेळी सर्वच नगरसेवकांना बोलण्यास द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सोमवारी झालेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांना बोलण्यास संधी मिळाली नाही. नगरसेवकांना याबाबत सूचना करता याव्यात म्हणून बोलण्यास द्यावे. अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात होती. मात्र सभागृह उशिरापर्यंत सुरु असल्याने शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी चर्चा तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी विशेष करून भाजपच्या सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याने त्यांनी सभात्याग केला.