मुंबई - भांडुप येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा सेप्टिक शॉकने (Septic Shock - Infection) मृत्यू झाला असून, एक बालक अत्यवस्थ असल्याच्या घटनेप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. एनआयसीयूमध्ये जीवघेणे इन्फेक्शन होतेच कसे? असा प्रश्न उपस्थित करून नवजात बालमृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
माहिती देताना भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे हेही वाचा -Anil Deshmukh Case : चौकशी समिती अहवाल लीक प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार
आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर -
या घटनेचा निषेध करत महापौरांच्या दालनाबाहेर भाजप नगरसेवकांनी निदर्शने केली. यावेळी पेंग्विन बाळाच्या बारशात मशगूल सत्ताधाऱ्यांना बालमृत्यूने शोकाकुल असणाऱ्या मुंबईकरांचे सोयरसुतक नसून पालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे, अशी घणाघाती टीका प्रभाकर शिंदे यांनी केली.
मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू -
रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा सेप्टिक शॉकनेच मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रुग्णालयातील एनआयसीयू ( नवजात शिशू अतिदक्षता विभाग ) हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट खासगी वैद्यकीय संस्थेस दिले आहे. या संस्थेबाबत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी आणि जागृती पाटील यांनी वारंवार तक्रार करून आरोग्य समितीत आवाज उठवल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेने व रुग्णालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरवर्षी साडेचार हजार कोटी आरोग्य यंत्रणेवर खर्च केल्यानंतरही मुंबईकरांच्या नशिबी असे दुर्दैवी मृत्यू असतील तर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कोणी विश्वास ठेवण्यास धजावेल का ? असा सवाल गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -
याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापन खासगी संस्थेकडून काढून घेऊन सदर खासगी संस्थेचा वैद्यकीय परवाना आणि नोंदणी रद्द करावी. तसेच, या नवजात अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, खासगी संस्थाचालक, पालिकेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच, अतिरिक्त आयुक्त यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार - कोटक
माहिती देताना भाजपचे खासदार मनोज कोटक मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामध्ये एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. गेल्या चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कुठल्यातरी इन्फेक्शनमुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचा रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आले होते. परंतु, अद्यापही पालिका प्रशासनाला नेमके इन्फेक्शन कशामुळे झाले याचा शोध घेता आला नाही. त्यामुळे, या रुग्णालयात नेमके काय झाले ज्यामुळे बालकांचा मृत्यू झाला, असा सवाल उपस्थित होत आहे. ही घटना गंभीर असून या संदर्भात संबंधित दोषी व्यक्ती विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले.
हेही वाचा -Mumbai Health Vacancies Report : मुंबई आरोग्य विभागातील ४५ टक्के पदे रिक्त