मुंबई- नायर रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टारांकडून रॅगिंग झाल्याने शिकाऊ महिला डॉक्टर पायल तडवी यांनी आत्महत्या केली. पायल ही नायर रूग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या प्रकरणी डीनकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्थायी समितीत केली.
डॉ. पायल आत्महत्या प्रकरण; रुग्णालय अधिष्ठाता निलंबित करा - भाजप नगरसेवकाची मागणी
डॉक्टर पायल तडवी यांनी वरिष्ठ डॉक्टारांकडून झालेल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी डीनकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्थायी समितीत केली.
डॉ. पायलने पालिका रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहात रॅगिंगमुळे आत्महत्या केल्याने त्याचे पडसाद आज स्थायी समितीत उमटले. रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचे पद सातत्य ठेवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रशासनाने आणला होता. यावेळी अभिजित सामंत यांनी समिती सदस्य आणि प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणला. रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहात त्या राहत होत्या. मात्र तेथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरून पायलला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. एकांतात, रुग्णांसमोर तिचा सातत्याने पाणउतारा सुरू ठेवला. व्हॉट्सअॅप समूहात पायलला उद्देशून टोमणे मारू लागल्या. शिक्षण पूर्ण होऊ देणार नाही, अशा धमक्या देऊ लागल्या होत्या. तशी तक्रार तिच्या आईने रुग्णालयाच्या डीनकडे केली होती. त्यानंतरही डीनने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामंत यांनी केली.
राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये महिलांवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यासाठी विशाखा समिती असते. तशी समिती पालिकेच्या ठिकाणी का नाही ? एका महिला डॉक्टरला पालिकेच्या रुग्णालयात त्रास दिला जात असताना रुग्णालय प्रशासनाने कारवाई का केली नाही ?, असे प्रश्न सामंत यांनी उपस्थित केले. पालिकेच्या रुग्णालयात करोडो रुपये खर्च करून खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तरीही सायन रुग्णालयात एका रुग्णालयाच्या महिला नातेवाईकावर बलात्कार करण्यात आला. यावरून रुग्णालयात रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टरही सुरक्षित नसल्याचा आरोप सर्व पक्षीय नसगरसेवकांनी केला. यावर सायन रुग्णालय प्रकरणी आम्ही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहेत. नायरमधील डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे यावर जास्त काही बोलू शकत नसल्याचे सांगत पालिकेच्या अधिकारी अश्विनी जोशी यांनी वेळ मारून नेली.