मुंबई -राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाल्याने महाविकास आघाडी सरकारला फार मोठा धक्का बसला आहे. विशेषतः शेवसेनेने संजय पवार यांना निवडून आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा पणाला लावली होती. आता विधान परिषदेच्या ( Legislative Council Election 2022 ) १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाने या निवडणुकीत प्रसाद लाड ( Prasad Lad candidate in BJP Legislative Council elections ) यांना पाचव्या क्रमांकावर उमेदवारी दिल्याने व काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकावर भाई जगताप ( Bhai Jagtap Congress candidate ) यांना उमेदवारी दिल्याने, लाड की जगताप? यांच्यामध्ये मुख्य चुरस रंगणार आहे.
१० जागा ११ उमेदवार :राज्यसभे पाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढणार यात काही शंका नाही. कारण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. परंतु काँग्रेसने त्यांचा दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने आता ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी हा चांगलाच सामना रंगणार आहे. विशेष करून दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.
जगताप की लाड? :या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहता भाजपाचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र भाजपाने पाचवा उमेदवार दिल्याने व काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्याने यापैकी कोण उमेदवार बाजी मारतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगताप निवडून येणे कॉंग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेचे आहे. कारण मुंबई महानगर पालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला आहे. भाई जगताप यांना निवडून आणण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर प्रचंड दबाव आहे. आपली मते फुटणार नाहीत याची दक्षता या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपाने पूर्ण रणनीती आखली आहे. देवेंद्र फडणवीस लाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असून लाड यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिक संबंध असल्याचा फायदाही त्यांना होणार आहे. लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. तसेच सध्या ते महाविकास आघाडी सरकार विरोधात बोलायची एकही संधी सोडत नाहीत. याचा फायदा मुंबई महानगर पालिकेत भाजपाला नक्कीच होणार आहे. त्या अनुषंगाने लाड यांचा विजय पक्षासाठी महत्वाचा आहे.