महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 15, 2019, 5:29 PM IST

Updated : Oct 15, 2019, 6:09 PM IST

ETV Bharat / city

विधानसभा २०१९ : भाजपच्या 'संकल्प'नाम्यात सावरकर, आंबेडकर.. तर शिवसेनेची १० रुपयात सकस थाळी

काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनंतर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा 'संकल्पनामा' प्रसिद्ध केला. शिवसेनेने मांडलेले अनेक मुद्दे भाजपने आपल्या संकल्पनाम्यात घेतले आहेत. शेती, ग्रामीण विकास, दुष्काळ निवारण, रोजगार, शिक्षण व पायाभूत सुविधा या अंगांनी दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांचा घेतलेला तौलनिक आढावा..

जाहीरनामा

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे धुमशान आता ऐन रंगात आले असून आधी शिवसेनेने आपला वचननामा व आज भाजपनं त्यांचा संकल्पनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही पक्षांनी जवळपास सर्व मुद्यांना स्पर्श करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने आपल्या संकल्पनाम्यातून 16 सूत्री कार्यक्रम, तर शिवसेनेही आपल्या वचननाम्यातून सर्व क्षेत्रातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. १० रुपयात सकस भोजनाची थाळी ही शिवसेनेच्या, तर सावरकरांना भारतरत्न पुरस्कारासाठी पाठपुरावा हे भाजपच्या जाहीरमान्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

शिवसेनेने १० रुपयात भोजनाची थाळी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपनेही ५ रुपयात सकस आहार देण्याचे जाहीर करून या थाळीयुद्धात उडी घेतली होती. परंतु आता प्रसिद्ध झालेल्या संकल्पनाम्यातून थाळी गायब झाली आहे.

भाजपचा संकल्पनामा प्रसिद्ध करताना भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आदि.

शिवसेना व भाजपच्या जाहीरनाम्यांची तुलना -

दुष्काळ व शेती -

भाजपने राज्याच्या दुष्काळ निवारणासाठी व दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठीचा संकल्प आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीड व राज्यातील प्रत्येक गावात पाईपलाईनने पाणी पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. तर शिवसेनेने शहरी मतदारांना खास करून मुंबईवासीयांना डोळ्यासमोर ठेऊन आपला वचननामा तयार केला आहे. त्यामध्ये ग्रामीण प्रश्न तुलनेने कमी आहेत. अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणे व कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्याचा मुद्दा शिवसेनेने जाहीरनाम्यात घेतला आहे.

पायाभूत सुविधा -

दुष्काळी भागात पेयजल आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे. पायाभूत सुविधांसाठी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 30 हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधणार. रस्त्यांच्या देखभालीसाठी विशेष यंत्रणा राबवणार, आदि आश्वासने भाजपने दिली आहेत. तर राज्यातील सर्व खेड्यांमधील रस्ते टिकाऊ करण्याचे धोरण आखणे. गावांच्या प्रत्येक वाडीपर्यंत एम-६० म्हणजे सिमेंटचे रस्ते बांधणे. शहरांच्या विकासासाठी 'मुख्यमंत्री शहर सडक योजना' अंमलात आणणार. सर्व नगरपरिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे. त्याचबरोबर ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करण्याचे म्हटले आहे.

शिवसेनेचा 'वचननामा' प्रसिद्ध करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.
घरकूल योजना -
२०२२ पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला पक्के घर देण्याचे आश्वासन भाजपने आपल्या संकल्पनाम्यातून दिले आहे. तर पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री आवास योजना' अंमलात आणून राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे घर देणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. मात्र योजना पूर्णत्वाची डेडलाईन सांगितली नाही. मुंबईत ५०० चौ.फूटांच्या सदनिकांना मालमत्ता करातून सूट.
आरोग्य -
जनआरोग्य योजनांतून 90 टक्के लोकसंख्या आरोग्यसेवेच्या कवचाखाली आणणार. 90 टक्के जनतेला मोफत उपचार देणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार असल्याचे व ज्या आरोग्य चाचण्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेच्या आहेत. अशा जवळपास २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या केवळ १ रुपये नाममात्र शुल्कात करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले आहे.

शिक्षण -

उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणार असल्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मात्र यासाठी काय उपाययोजना करणार हे स्पष्ट केलेले नाही. तर आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार व राज्यातील १५ लाख पदवीधर तरुणांना युवा सरकार फेलो मार्फत शिष्यवृत्तीची संधी देणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

रोजगार -
येत्या ५ वर्षांत १ कोटी नोकऱ्या देणार असल्याचे मोठे आश्वासन भाजपने दिले आहे. सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षेच्या योजना लागू करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षणासाठी कायदा बनवून भूमिपुत्रांना न्याय देणार, राज्य सरकारमधील सरकारी नोकरीतील सर्व स्तरातील सर्व रिक्त पदे भरणार, यापुढे पोलीस भरतीमध्ये पूर्वीप्रमाणे प्रथम मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घेणार असल्याचे शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

सामाजिक मुद्दे -

माजी सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याच्या योजना, प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी कालबद्ध कार्यक्रम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी पाठपुरावा करणार तसेच 2020 पर्यंत आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच ज्या शिवछत्रपतींच्या नावाने २०१४ मध्ये राज्याची सत्ता मिळाली त्यांच्या अरबी समुद्रातील शिवाजी स्मारकाचा उल्लेख भाजपने आपल्या संकल्पनाम्यात केला आहे. शिवसेनेने आपला मराठीचा पुन्हा जागर केला असून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार असल्याचे वचननाम्यात म्हटले आहे.

भाजपच्या संकल्पनाम्यातील प्रमुख मुद्दे -

  • दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प.
  • मराठवाडा वॉटर ग्रिडची स्थापना करणार. प्रत्येक गावापर्यंत पाईपने पाणी पुरवणार
  • दुष्काळी भागात पुढच्या पाच वर्षांत पाणी पोचवणार. उद्योग, शेतकरी यांना पाणी देणार.
  • प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचं पाणी देणार.
  • शेतीला १२ तास दिवसाची वीज देणार, सौर ऊर्जेवर आधारित ही वीज असेल.
  • येत्या ५ वर्षांत १ कोटी नोकऱ्या देणार, गेल्या ५ वर्षात ५९ लाख रोजगार निर्माणाचा दावा
  • पायाभूत सुविधांसाठी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक.
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 30 हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधणार.
  • रस्त्यांच्या देखभालीसाठी विशेष यंत्रणा राबवणार.
  • २०२२ पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला घर देणार.
  • जनआरोग्य योजनांतून 90 टक्के लोकसंख्या आरोग्यसेवेच्या कवचाखाली आणणार. 90 टक्के जनतेला मोफत उपचार देणार.
  • उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणार.
  • सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षेच्या योजना लागू करणार.
  • माजी सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याच्या योजना आणणार.
  • प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी कालबद्ध कार्यक्रम.
  • महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांच्या भारतरत्नासाठी पाठवुरावा करणार.
  • २०२० पर्यंत इंदू मिल येथील आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करणार.

शिवसेनेच्या वचननाम्यातील वचनं

  • आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
  • प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गट भवन उभारणार
  • राज्यातील १५ लाख पदवीधर तरुणांना युवा सरकार फेलो मार्फत शिष्यवृत्तीची संधी देणार
  • अल्पभूधारक व आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी १० हजार रुपये थेट जमा करणार
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करणार
  • तालुका स्तरावर गाव ते शाळा, महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी एक्सप्रेस' अशा २५०० विशेष बसची सेवा सुरू करणार
  • राज्यातील सर्व खेड्यांमधील रस्ते टिकाऊ करण्याचे धोरण आखणार. गावांच्या प्रत्येक वाडीपर्यंत एम-६० म्हणजे सिमेंटचे रस्ते बांधणार
  • शहरांच्या विकासासाठी 'मुख्यमंत्री शहर सडक योजना' अंमलात अणणार. सर्व नगरपरिषदा, नगरपालिका आणि महागनरपालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार
  • ३०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार
  • सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
  • १० रुपयांमध्ये सकस आहार देणार. राज्यात एक हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्र स्थापन करणार
  • २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत त्या १ रुपयात करणार
  • स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षणासाठी कायद्या बनवून भूमिपुत्रांना न्याय देणार
  • राज्य सरकारमधील सरकारी नोकरीतील सर्व स्तरातील सर्व रिक्त पदे भरणार
  • पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री आवास योजना' अंमलात आणून राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतः घर देणार
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार
  • यापुढे पोलीस भरतीमध्ये पूर्वीप्रमाणे प्रथम मैदानी परीक्षा व नंतर लेखी परीक्षा घेणार
Last Updated : Oct 15, 2019, 6:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details