मुंबई -अन्वय नाईक प्रकरणी भाजपाने आरोपीला पाठीशी घालण्याचे काम यापूर्वीही केले आहे आणि आताही करत आहे. किरीट सोमैय्या यांनी ज्या जमिनीच्या व्यवहारावरून बाऊ सुरू केला आहे, त्या जमिनीचा व्यवहार हा अन्वय नाईक व त्यांच्या हयातीमध्ये झाला होता. परंतु भाजप आणि सोमैय्या यांनी हे जमीन व्यवहार झाले ते काढून दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, या माध्यमातून त्यांनी या प्रकरणात हीन पातळी गाठली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांची रेवदंडा येथील जमीन खरेदी केल्याचा दावा करत त्यावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप करणे सुरू केले आहे. मात्र या जमिनीचे व्यवहार हे अन्वय नाईक हे हयात होते, त्यावेळी रीतसर आर्थिक व्यवहार होऊन झाले होते, तरीही सोमय्या यांनी आरोप सुरू केल्याने यावर आज सचिन सावंत यांनी सोमैय्या यांनाच धारेवर धरले आहे.
अन्वय नाईक प्रकरणी भाजप आणि किरीट सोमैय्या यांनी हीन पातळी गाठली, काँग्रेसचा आरोप
अन्वय नाईक प्रकरणी भाजप आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. किरीट सोमैय्या यांनी ज्या जमिनीच्या व्यवहाराचा मुद्दा उकरून काढला आहे, त्याचा व्यवहार अन्वय यांच्या हयातीमध्येच झाला होता. या माध्यमातून त्यांनी हीन पातळी गाठली आहे.
ज्यासाठी न्याय मागतात तोच भाजपाशी संबंधित-
सावंत म्हणाले की, मागील काळामध्ये भाजपाच्या आयटी सेलकडून अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो अत्यंत वाईट पद्धतीने प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यावरून भाजप हे किती खालच्या पातळीवर जाऊन असे वर्तन करू शकते हे समोर आले आहे. अन्वय नाईक हे कुटुंब आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तीने आत्महत्या केली त्यावर न्याय मागत आहे, त्यात त्यांची काही चूक आहे, ज्यासाठी न्याय मागतात तोच भाजपाशी संबंधित आहे आणि यामुळेच अन्वय नाईक परिवाराला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून दिला नाही. सरकारने हे प्रकरण दाबून टाकले आणि त्याची साधी चौकशीसुद्धा होऊ दिली नाही, असा आरोप सावंत यांनी केला.
भाजपचा थेट संबंध असल्याने प्रकरण दाबले -
रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख प्रवर्तक व खासदार राजीव चंद्रशेखर हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांनी रिपब्लिकन टीव्हीला जे काही फंडिंग केलं ते भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानेच केलेले आहे. यात कोणतीही शंका नाही. यामुळेच भाजपाचा या प्रकरणात थेट संबंध असल्याने फडणवीस सरकारने अन्वय नाईक प्रकरणात या कुटुंबाला न्याय मिळू दिला नाही. आजही त्याच कारणामुळे हे प्रकरण भाजपाकडून दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय.अर्णब गोस्वामी संदर्भात भाजप ज्याप्रकारे आकांडतांडव करतो त्यावरून दिसून आल्याचे सावंत यांनी सांगितले. आता एका मराठी परिवाराला न्याय मिळतो हे भाजपाला पाहवत नाही. यातून भाजपा महाराष्ट्रविरोधी आहे, हे दिसून आले आणि हे पुन्हा अधोरेखित झाले असल्याचे सावंत म्हणाले.