मुंबई- शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी दहा रुपयात जेवण देऊ, अशी घोषणा केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या महिन्यातच ‘शिव भोजन थाळी’ ही योजना बनवण्यात आली. तसेच २६ जानेवारीपासून मुंबईतील १५ ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे. मात्र, शिवभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी ज्या अटी आणि शर्ती पुढे येत आहेत, त्यावरुन या योजनेवर भाजपने टीका केली आहे.
हेही वाचा -सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीसाठी कायदा - सुभाष देसाई
तीन महिन्यांपर्यंत दहा रुपयांची थाळी घेण्यासाठी ग्राहकाला आपले आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. तसेच फोटो देखील द्यावा लागणार आहे. हे सरकार जे नियम अटी घालेल त्याला आमचा विरोध आहे. लोकं दहा रुपये देणार आहेत, फुकट नाही खाणार. त्यामुळे कोणत्याही अटी शर्ती आम्ही सरकारला लावू देणार नाही, असे म्हणत कोणत्याही अटी शर्ती न लावता सर्वाना थाळी द्या, ही विनंती भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे.
दहा रुपयांच्या थाळीची किंमत जवळपास ५० रुपये आहे. यातील दहा रुपये हे ग्राहकाकडून आणि उर्वरित ४० रुपयांचे अनुदान स्वरूपात राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. याच सबसिडीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठा आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. अशातच आता पुन्हा एकदा या थाळीला अटी शर्तीवरून मोठा वादंग निर्माण होणार आहे, असे चित्र आहे.