मुंबई - भारतीय जनता पक्षाने सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून, त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चौथ्या यादीत मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश असून, यामध्ये कुलाब्यातून राहूल नार्वेकर, बोरिवलीतून सुनिल राणे तसेच घाटकोपर पूर्व मधून पराग शहा यांना उमेदवारी मिळाली आहे.
विशेष म्हणजे बोरीवलीतून विद्यमान मंत्री विनोद तावडे यांचाही पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्या जागी सुनिल राणे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. तर घाटकोपर मधून माजी मंत्री प्रकाश मेहता तसेच कुलाबा मतदारसंघातून राज पुरोहीत यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
संबंधित यादीमध्ये तुमसरमधून संदीप पडोळे, काटोल मधून चरणसिंग ठाकूर तर नाशिक पूर्व मतदारसंघातून राहूल ढिकळे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.
या यादीत उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अद्यापही समावेश करण्यात आला नसल्याने भाजपच्या गोटात चर्चांना सुरुवात झाली आहे.