नवी मुंबई - ऐरोली खाडी परिसरात ठिकठीकाणी रुग्णालय, मेडिकल, लॅबमधील औषधांचा जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये कोरोना टेस्ट केलेल्या कांड्या, ज्यूस पावडर, हॅन्डग्लोज, इंजेक्शन सीरिंज अशाप्रकारच्या वापरलेल्या घातक जैविक कचऱ्याचा समावेश आहे. ऐरोलीतील 'विथ देम फॉर देम' या संघटनेने याचा खुलासा केला असून, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता
ऐरोली सेक्टर १९-२० परिसरातील खाडी किनारी अनेक ठिकाणी वापरलेल्या औषधांचा जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. किमान १ किलोमीटर पर्यंत हा कचरा पसरला आहे. शहरात सुक्या व ओल्या कचऱ्याच्या वर्गीकरणासह ई-कचरा व रुग्णालयातून जमा होणारा जैविक कचराही वेगळा करून देण्याबाबतचे धोरण पालिकेने आखले आहे. मात्र असे असतानाही या कोरोनाच्या महामारीत जैविक कचऱ्याचे ढीग थेट उघड्यावर टाकल्याने "विथ देम फॉर देम" या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन, याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेने अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी 'विथ देम फॉर देम' संघटनेचे आशिष सावंत यांनी केली आहे.