मुंबई - मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. असंतोष व्यक्त करण्यासाठी व मराठा समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मुंबई आंदोलन घेण्यापूर्वी मराठा समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे. या बाईक रॅलीमध्ये मराठा समाजातील लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार रॅलीमध्ये मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सहभागी होणार आहेत. आज सकाळपासूनच मुंबईच्या सोमय्या मैदानामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार विनायक मेटे, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे या बाईक रॅलीच्या ठिकाणी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याकरता मराठा संघर्ष मोर्चाद्वारे आज मुंबईमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समन्वयक राजन घाग यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सोमय्या मैदानमध्ये या बाईक रॅलीला मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे याठिकाणी आलेले होते. त्यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितले की, जोपर्यंत मराठा समाजाला आपला हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही जनप्रतिनिधी म्हणून गप्प बसणार नाही आणि सरकारला जागे करण्यासाठी आम्ही बाईक रॅली काढत आहोत.
'मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन न बोलावल्यास आम्ही पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही'. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे हे सुद्धा या आंदोलन स्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या सरकारमधेच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संभ्रमावस्था आहे. अधिवेशनाच्या काळात आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा पहिल्या तासापासूनच लावून धरणार आहोत आणि अधिवेशन चालू देणार नाही आहोत. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षण करता राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलत नाही आणि चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच मराठा समाजाला त्यांचे न्याय्य हक्क दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार विनायक मेटे यांनी माध्यमांना दिली.
भाजपा आमदार प्रसाद लाड हेदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये प्रसाद लाड स्वतः बाईक चालवत सहभागी झाले. माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड बोलताना सांगितले की, मी कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही. मला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मला धमकी आलेली आहे, परंतु या धमक्यांना मी भीक घालत नाही आणि या सरकारला आम्ही जाग करण्याचं ठरवलं आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आमचा अविरतपणे संघर्ष सुरू असणार आहे.