मुंबई - दरवर्षी गोविंदा पथके 'दहीकाला उत्सव' मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे या उत्सवावर विरजण पडले आहे. भारतातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमदार राम कदम यांच्या लक्षवेधी दहीहंडीची दरवर्षी सर्वत्र चर्चा असते. मात्र, यंदा कदम यांनी आगळीवेगळी दहीहंडी उत्सव साजरा करत कोरोना महामारीतून भारत मुक्त व्हावा या संकल्पनेतून प्रतिकात्मक दहीहंडी उत्सव साजरा केला आहे.
घाटकोपरच्या श्रेयस सिनेमा येथील चौकात हा दहीहंडी उत्सव साजरी केला असून या प्रतिकात्मक दहीहंडी उत्सवातून कोरोनामुक्त भारत आणि चिनी वस्तूवर बहिष्कार ही संकल्पना ठेवण्यात आली होती. यावेळी कृष्णा आणि राधाच्या वेशात असलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आली.