मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शीख समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त शीख समुदायाचे लोक खार पश्चिम कंगनाच्या घराबाहेर आंदोलन करणार होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी शीख समुदायाच्या लोकांना दूरवर रोखले आहे. खार पोलीस स्टेशनने कंगनाच्या घराबाहेर चोख बंदोबस्त ठेवला आहे. शीख समुदायही कंगनाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.
'कंगनाला एकतर मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा'
कंगना रणौत आणि वाद यांचा खोलवर संबंध आहे. ती तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते तर कधी त्या वक्तव्यांमुळे ती अडचणीत येते. आता नुकतेच कंगनाच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. मनजिंदर सिंग सिरसा सांगतात की, आता कंगनाच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जाईल आणि त्याचवेळी या प्रकरणी महाराष्ट्र सचिवालयात गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा (Manjinder Singh Sirsa) यांनी शिखांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कंगनावर टीका केली. तिच्यावर सरकारने कारवाई करावी, असे ते म्हणाले. त्याने ट्विट करून म्हटले की, 'कंगनाला एकतर मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले पाहिजे किंवा तुरुंगात पाठवले पाहिजे.' अशी मागणी सिरसा यांनी केली आहे.
कंगना रणौतची वादग्रस्त पोस्ट -
कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर ही वादग्रस्त टिप्पणी केली आहे. कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाने लिहिले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी या खलिस्तानींना डासाप्रमाणे चिरडले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या प्राणाची किंमत मोजली पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. आजही त्यांच्या नावाने हे खालिस्तानी थरथर कापतात, त्यांना तशाच गुरूची गरज आहे. तसेच शुक्रवारी कायदे रद्द झाल्यानंतर ती म्हणाली होती की, "दुःखद आणि लज्जास्पद ...संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या ऐवजी रस्त्यावरील लोक जर कायदे करु लागले तर ते राष्ट्र जिहादी आहे. ज्यांना जे पाहिजे होते त्यांना ते मिळाले त्यांचे अभिनंदन."