मुंबई -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी मुंबईत येतात. या अनुयायांना मुंबई पालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. याच सोयी सुविधेचा भाग असलेल्या नळांना पाणीच नसल्याने अनेक अनुयायांचे हाल झाल्याचे उघडकीस आले आहे.
पालिकेच्या नळांना पाणीच नाही, भीम अनुयायांचे हाल - Mahaparinirvan Day News
मुंबईत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी मुंबईत आले आहेत. त्यांना मुंबई महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांचा भाग असलेल्या नळांना पाणीच नसल्याने या अनुयायांचे हाल झाल्याचे समोर आले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे दरवर्षी पंचवीस लाखांहून अधिक भीम अनुयायी येतात. या लाखो अनुयायांना पाणी, राहण्याची, आणि आरोग्य सेवा पालिकेकडून देण्यात येते. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमिपासून सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी, वरळीपर्यंत रांगा लागलेल्या असतात.
आठ ते दहा तासाहून अधिक काळ रांगेत उभे राहून भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करतात. या अनुयायांसाठी पालिकेने रांगेच्या ठिकाणी पाण्यासाठी नळ लावलेले आहेत. मात्र, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ते वरळी या परिसरातील नळांना ५ डिसेंबरच्या रात्रीपासून पाणीच नसल्याचे निदर्शनास आले आहे. नळांना पाणी नसल्याने रांगेत उभे असलेल्या भीम अनुयायांचे हाल होत असल्याने पालिकेविरोधात नाराजी पसरली आहे.