मुंबई - भाऊचा धक्का ते मांडवा या दरम्यान रो-रो सेवा सुरू केल्यामुळे मुंबईहुन अलिबागला अवघ्या पाऊण तासात पोहोचणे शक्य झाले. मात्र, ही सेवा सुरू होऊन 4 दिवस झाले, तरीही रो-रो साठी प्रवासीच मिळत नसल्याने ही सेवा नावापुरती उरली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना, लोकांनी घराबाहेर पडणे कमी केले. त्यातच ही सेवा सुरू झाल्याने सुरुवातीलाच या सेवेला मोठा फटका बसला आहे. बुधवारी तर रो-रो ची एकही फेरी झाली नसून यापुढेही फेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सेवेचा 'मुहूर्त'च चुकल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.
हेही वाचा...कोरोनाची आर्थिक झळ : इंडिगोकडून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात
कोट्यवधी रुपये खर्च करत 15 मार्चला रो रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रीसवरून आणलेल्या जहाजातून एकाचवेळी एक हजार प्रवासी आणि 200 कार वाहून नेणे यामुळे शक्य झाले आहे. या सेवेअंतर्गत दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत. मात्र, कोरोनाचा धोका वाढल्याने सेवा सुरू झाल्याच्या दिवसापासून प्रवासी मिळत नसल्याने रो-रो च्या फेऱ्याच होत नसल्याचे चित्र आहे.