मुंबई -शिवसेना वाचविण्यासाठी माघारी फिरण्याचे आवाहन भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोपही केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सत्ता आणण्यासाठी भावाभावामध्ये भांडण लावले आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा भारतीय जनता पक्ष उभा करीत आहे. शिवसेना संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने आपल्या हाती घेतला आहे. म्हणून एकदा शिंदेंनी स्वतः शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावले मागे यावी, अशी आर्त हाक विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान भास्कर जाधव यांनी मांडली. तसेच गेले आठ दिवस आपण अस्वस्थ आहोत. झाल्या प्रकरणामुळे आपल्याला झोपही लागत नाही, अशी व्यथा ही भास्कर जाधव यांनी मांडली.
बोलू दिले जात नाही - हे भाषण करत असताना भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सदनामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण खरं तेच बोलत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या वर्मावर घाव घालत आहोत. म्हणूनच आपल्याला बोलू दिले जात नाही, असा आरोप ही भास्कर जाधव यांनी भाषणावेळी केला. शिवसेनेचे 40 आमदार आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मात्र, सर्वसामान्य शिवसैनिक हा दुसऱ्या बाजूला उभा आहे. कोण कोणाला घायाळ करेल याचा एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. महाराष्ट्रात पुन्हा पानिपतची पुनरावृत्ती होईल, अशी भीतीही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान शिंदे यांना बोलून दाखविली.
केवळ मराठी माणसांना ईडी लावली जाते -एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक जणांना ईडीची भीती दाखवण्यात आली आहे. केवळ मराठी माणसाला इडीची भीती दाखवण्यात येते, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर केले गेलेले आरोप हे भारतीय जनता पक्षानेच केले होते. मंत्री म्हणून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना ठेवल्यास आंदोलनाचा इशारा भाजपने दिला होता. मग आता संजय राठोड त्यांना चालतात का? असा सवालही आपल्या भाषणातून त्यांनी उपस्थित केला. तसेच ज्या यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांच्यावर ईडीच्या कारवाया झाल्या. आता त्यांच्याच घराखाली केंद्राची सुरक्षा पुरवली जाते, असा टोलाही भाजपला भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणातून लगावला.