महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2021, 2:57 PM IST

ETV Bharat / city

मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण केंद्र बंद, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पालिकेची धावपळ

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. पालिका कर्मचाऱ्यांमार्फत आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिका उपायुक्त अजय राठोर यांनी दिली. तसेच गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन राठोर यांनी केले आहे.

मुंबई - मध्यरात्रीपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. अनेक सखल भाग पाण्याखाली गेल्याने रस्ते व रेल्वे वाहतूक खोळंबली. मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जल शुद्धकरणं केंद्रालाही याचा फटका बसला. पावसाचे पाणी केंद्रात घुसल्याने यंत्रणेत बिघाड झाला. अनेक भागात दूषित पाणी पुरवठा झाल्याने काही काळ जलशुद्धीकरणाचे आणि पुरवठ्याचे काम थांबविण्यात आले. दरम्यान, यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुंबईकरांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अनेक भागात पाणीपुरवठा दूषित

मुंबईत रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप संकुलातील या समस्येमुळे मुंबईतील होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पाणी उकळून प्या

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. पालिका कर्मचाऱ्यांमार्फत आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिका उपायुक्त अजय राठोर यांनी दिली. तसेच गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन राठोर यांनी केले आहे.

पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती पालिका जलविभागाने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details