मुंबई -भांडुप येथील ड्रीम्स मॉल मधील सनराईज हॉस्पिटलला गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. ही आग अद्यापही विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला असून हे मृत्यू निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
गुन्हा दाखल केला जाणार -
भांडुप पश्चिमेला ड्रीम्स मॉल आहे. या मॉलला रात्री 12 वाजता आग लागली. या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज हे हॉस्पिटल आहे. मॉलला काचेच्या खिडक्या असल्याने धूर आत राहून आग पसरली. यामुळे सनराईज हॉस्पिटलमधील रुग्णांना बाहेर काढण्यात आले. एकूण 78 रुग्णांना बाहेर काढले त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाकडून फायर आणि इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात 10 मृत्यूला जबाबदार म्हणून गुन्हा दाखल केला जाईल. चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे नगराळे यांनी सांगितले.
या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची नावे खालीलप्रमाणे -
1 निसार जावेदचंद 74 वर्ष पुरुष
2 मुणगेकर 66 वर्ष पुरुष
3 गोविंदलाला दास 80 वर्ष पुरुष
4 मंजुला बथारिया 65 महिला
5 अंबाजी पाटील 65 वर्ष पुरुष
6 सुनंदाबाई पाटील 58 वर्ष महिला
7 सुधीर लाड 66 वर्ष पुरुष
3 अनोळखी मृतदेह
22 जणांचा शोध सुरू -
भांडुप सनराईज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये 78 पैकी 46 रुग्णांचा शोध लागला आहे. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शोध लागलेल्या 46 जणांपैकी जंबो कोविड सेंटर येथे 30, फोर्टीस रुग्णालय 4, ठाणे विराज रुग्णालय 2, बिकेसी जंबो 1, घाटकोपर गोदरेज रुग्णालय 1, सारथी हॉस्पिटल टॅंक रोड 1, अगरवाल हॉस्पिटल 5 तर घरामध्ये 2 रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. इतर रुग्णांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
आगीची चौकशी होणार -
आग लागलेल्या रुग्णालयाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही परवानगी होती. त्यांना एक महिन्याची परवानगी वाढवून 31 मार्चपर्यंत कशी वाढवण्यात आली याची चौकशी केली जाईल. या प्रकरणाची आणि आगीची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.