मुंबई -शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे कारागृहामध्ये अभंग आणि भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, या अभंगात स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे की, ही स्पर्धा राज्यातील 27 कारागृहामध्ये पार पडणार असून या स्पर्धेमध्ये या कारागृहातील कैदी सहभाग घेणार आहेत. कारागृहात होणाऱ्या या अभंग व भजन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांच्या हस्ते पार पडले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी (दि. 19 मे) या भजन आणि अभंग स्पर्धेचा झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडकवला. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या तीन स्पर्धकांना करंडक देऊन त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात यावेळी स्पर्धा भरवणारे शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून भजनी मंडळीही आले होते. या भजनी मंडळींच्या टाळ आणि मृदुंगाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरात या उपक्रमाची सुरुवात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाली.