मुंबई - महानगरपालिकेकडून शहर विभागात १०२ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा खोटा असल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे. पालिकेतील विरोधीपक्ष नेत्यांकडून आज नालेसफाईची पाहणी करण्यात आली, त्यानंतर पालिकेचा दावा खोटा असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
पालिकेचा १०२ टक्के नाले सफाईचा दावा खोटा - भाई जगताप 'नालेसफाईचा दावा खोटा' -
मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यादरम्यान व पावसाळ्यानंतर नालेसफाई केली जाते. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मुंबईची तुंबई होत असल्याने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर विशेष भर पालिकेकडून दिला जातो. मागीलवर्षीही कोरोनाच्या काळात नालेसफाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मुंबई तुंबली होती. यंदाही कोरोनाची दुसरी लाट असताना पालिकेने नाले सफाईचा दावा केला आहे. मुंबईमध्ये एकूण सरासरी ९८ टक्के तर शहर विभागात १०२ टक्के नालेसफाईचा दावा महापालिकेने केला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या या दाव्याची शहनिशा करण्यासाठी पालिकेतील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांच्या उपस्थितीत भाई जगताप यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना गोवंडी, चेंबूर, सायन आदी विभागात नाल्याची पाहणी केली. त्याठिकाणी पालिकेने नालेसफाईचा जितका दावा केला तितकी नालेसफाई झाली नसल्याचे जगताप यांनी सांगितले.
'हे चालू देणार नाही' -
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. हा प्रसार कमी होत असताना नालेसफाई झाली नसल्याने अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो. धारावी मॉडेलचे सर्वत्र नाव होत आहे. मात्र, धारावीतील नाल्यात कचरा आहे. यावरून नालेसफाई झाली नसल्याचे दिसते. आम्ही पालिकेत विरोधी पक्षात आहोत, नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही स्थायी समिती आणि सभागृहात आवाज उचलत राहू असे जगताप म्हणाले.