मुंबई - गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना सक्रमण रोखण्यासाठी, तसेच कोरोना काळात बॅंका बंद असल्यामुळे डिजिटल व्यवहार वाढल्याचे पाहालया मिळत आहेत. सोशल अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने सुद्धा आता डिजिटल आर्थिक व्यवहाराचा पर्याय उलब्ध करून दिला आहे, मात्र याचा गैरवापर होत असल्याचे समोर येत आहे. व्हॉट्सअॅपवर "व्हाट्सअॅप पिंक" नावाची एक लिंक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या अकांऊटमधील सर्व रक्कम, तुमची गोपनीय माहिती चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुयात 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट
कशी होते फसवणूक?
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर पिंक नावाची लिंक व्हायरल झालेली आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरची ग्रीन थीम बदलून पिंक करायची असेल तर या लिंक वर क्लिक करा, व सांगितलेली माहिती पूर्ण भरल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअॅपची थीम पिंक (गुलाबी) रंगाची होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र या लिंकवर क्लिक करताच या लिंकच्या माध्यमातून एक मालवेअर तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो, आणि तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती या मालवेअरच्या माध्यमातून चोरीला जावू शकते, त्यातून तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.