मुंबई- मुंबईची लाईफलाईन असलेली 'बेस्ट' आर्थिक संकटात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बेस्टने प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि डिजिटलायझेशन यामुळे प्रवासी संख्या आणि महसुलात वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात बेस्टच्या सहा लाख प्रवाशांची तर महसुलात एक कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे.
कमी दरात आरामदायी प्रवास - मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमाकडून परिवहन सेवा दिली जाते. बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटात आहे. बेस्टला चार हजार कोटींहून अधिकचा तोटा झाला आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कृती आराखडा दिला. खर्च कमी करताना उत्पन्न वाढवण्याचे आदेश बेस्टला दिले. त्यावेळी बेस्टने 5, 10, 15 आणि 20 रुपये इतके तिकीट दर केले. बेस्टने भाडेतत्वावर खासगी एसी बसेस कंत्राटी पद्धतीने आणल्या. स्वस्त आणि एसी आरामदायी प्रवास करायला मिळत असल्याने बेस्टचे प्रवासी वाढू लागले. त्याचप्रमाणे महसुलातही वाढ होऊ लागली.
वन नेशन वन कार्ड - प्रवाशांची संख्या वाढू लागल्यावर 'चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड' काढले आहे. जानेवारीमध्ये या ऍप आणि कार्डचे लोकार्पण पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत एकूण 62 हजार प्रवाशांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. सध्या प्रवास करणाऱ्या 30 लाख प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवाशांनी चलो ऍपचे स्मार्ट कार्ड खरेदी केले आहे. तसेच नुकतेच बेस्टने 'वन नेशन वन कार्ड' (कॉमन मोबिलिटी कार्ड) प्रवाशांच्या सोयीसाठी आणले आहे. यामुळे प्रवाशांना एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो, मोनो ने प्रवास करता येणार आहे, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
प्रवासी आणि महसूलात वाढ - कोरोना काळात बेस्टने 10 ते 12 लाख प्रवासी प्रवास करत होते. 1 एप्रिल 2021 रोजी प्रवासी संख्या 23 लाख 40 हजार 968 होती. त्यावेळी रोजचे उत्पन्न 1 कोटी 78 लाख 45 हजार 754 इतके होते. एप्रिल 2022 ला प्रवासी संख्या 29 लाख 63 हजार 754 वर पोहचली असून रोजचा महसूल 2 कोटी 83 लाख 5 हजार 513 वर पोहचला आहे. गेल्या वर्षभरात साडेसहा लाख प्रवासी आणि एक कोटी चार लाख रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बेस्टची प्रवासी संख्या सुमारे 30 लाख असून 3 कोटी रोजचा महसुल आहे, अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली.