मुंबई- मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्टकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आले आहे. याचा फायदा प्रवाशांना होत असून बेस्टमधील प्रवाशांची संख्या आणि बेस्टच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे.
बेस्ट होतेय डिजिटल -मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेली बेस्ट आर्थिक संकटात आहे. बेस्टवर चार हजार कोटीहून अधिकचे कर्ज आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कृती आराखडा दिला आहे. त्यानुसार बेस्टमध्ये भाडेतत्वावर बसेस घेण्यात आल्या असून भाड्यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढू लागली. प्रवाशांना आणखी चांगली सुविधा देण्यासाठी प्रवाशांना पास आणि तिकीट देण्यासाठी बेस्टने चलो अॅप आणि स्मार्ट कार्ड काढले आहे. जानेवारीमध्ये या अॅप आणि कार्डचे लोकार्पण पर्यावरण व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 62 हजार लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. सध्या प्रवास करणाऱ्या 30 लाख प्रवाशांपैकी बहुसंख्य प्रवाशांनी ( Chalo App ) चलो अॅपचे स्मार्ट कार्ड खरेदी केले आहे. लवकरच बेस्ट ' वन नेशन वन कार्ड ' ( One Nation One Card ) प्रवाशांच्या सोयीसाठी आणणार आहे. यामुळे प्रवाशांना एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो, मोनोने प्रवास करता येणार आहे.
चलो अॅप, चलो स्मार्ट कार्डचा फायदा -चलो अॅप आणि चलो स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासी भाड्यासह प्रवासाच्या ठिकाणापर्यंत ठराविक अंतराच्या अनुषंगाने बस पासची निवड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. एक दिवसापासून 84 दिवसांपर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून 150 फेऱ्यांपर्यंत पर्याय देण्यात आले आहेत. अॅपच्या माध्यमातून पास आणि तिकीट काढता येते. तसेच चलो अॅपचे ( Chalo App ) 70 रुपयांचे स्मार्ट कार्ड प्रवाशांना देण्यात येते. या कार्डच्या माध्यमातून पास, तिकीट काढता येणार आहे. या कार्डमध्ये दहा रुपयांपासून 3 हजार रुपयापर्यंत कितीही रक्कम रिचार्ज करता करता येते. हे कार्ड डेपो आणि कंडक्टरकडे उपलब्ध करून देण्यात आले असल्याने प्रवाशांना ते सहज उपलब्ध होते.