मुंबई- बेस्ट भवन कुलाबा येथे मंगळवारी बेस्ट प्रशासनासोबत बेस्ट कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या वेतनवाढ प्रश्नी व वाटाघाटी बाबत सकारात्मक चर्चा पार पडली. तसेच पुढील वाटाघाटीच्या बैठकीबाबत कृती समितीला बेस्ट उपक्रमाने लिखित आश्वासन दिले आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेस्ट संप तूर्तास स्थगित करण्यात आल्याची घोषणा बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.
बेस्ट कामगारांच्या प्रलंबित वेतन करार व इतर मागण्यांबाबत आंदोलनाची रणनीती आणि निर्णय घेण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्यावतीने परळ येथील शिरोडकर हॉल येथे मंगळवारी सांयकाळी बेस्ट कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात संप स्थगित करण्यात आला.