मुंबई -नव्या तिकीट प्रणालीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला वर्षाला ३५ कोटींचे नुकसान होणार आहे. बेस्टला नुकसान होणार असल्याने याबाबतच्या प्रस्तावाला भाजपाने विरोध केला आहे. त्यानंतरही बेस्ट समितीत सत्ताधारी शिवसेनेच्या अध्यक्षांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याचा निषेध म्हणून उद्यापासून बेस्ट समिती अध्यक्षांच्या दालनासमोर आंदोलन करणार आहे. तसेच न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
- भ्रष्ट आणि मनमानी कारभार -
बेस्ट उपक्रम आधीच तोट्यात सुरू आहे. असे असताना सत्ताधाऱयांनी एकाच कंपनीला निविदा दिल्यामुळे बेस्टचा अधिकच तोटा होणार आहे. मे.झोपहॉप या कंपनीला कंत्राट देण्याचा डाव असल्याचा आक्षेप भाजपने घेतला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीमध्ये तो खरा ठरला आहे. भाजपच्या सदस्यांना बोलून न देता शिवसेनेने बेस्ट समितीची बैठक ३ मिनिटात संपवली. मात्र, अशाप्रकारे मनमानी कारभार करून सत्ताधाऱ्यांनी बेस्ट उपक्रमाची लूट चालवली आहे. यामुळे आधीच तोटयात असलेला आणि दिवाळखोरीत गेलेला बेस्ट उपक्रम पूर्णपणे बंद पडेल, अशा शब्दात तीव्र निषेध भाजपच्यावतीने करत असून, भ्रष्ट आणि मनमानी कारभाराबाबत आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू तसेच या विरोधात धरणे आंदोलन करू, असा इशारा प्रभाकर शिंदे यांनी दिला. दरम्यान, या प्रस्तावाlला सुरुवातीला विरोध करणारे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रत्यक्ष बैठकीत कोलांटी उडी मारत प्रस्तावास पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचा खरा विरोधी चेहरा जनतेसमोर आला असल्याची टीका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
- सदस्यांचा आवाज दाबला जातो -
बेस्ट समितीमध्ये मी गेले २० वर्ष सदस्य आहे. गेल्या २० वर्षात ३ मिनिटात १२० कोटींचे प्रस्ताव कधीही मंजूर झाले नाहीत. बेस्ट समिती अध्यक्ष कोणत्याही प्रस्तावावर बोलायला देत होते. मात्र आता वेगळंच चालले आहे. पाच वेळा अध्यक्ष राहिलेल्या आशिष चेंबूरकर यांच्या काळात सदस्यांचा आवाज दाबला जात आहे. सदस्यांना बोलू दिले जात नाही. हे योग्य नाही. बेस्ट समितीमध्ये राहावे असे मला सतत वाटत होते. मात्र, आता अशा बेस्ट समितीमध्ये आपण आहोत याची खंत वाटत असल्याचे जेष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी म्हटले आहे.
- २० संस्थांनी दाखवले स्वारस्य -
३० जुलै २०२१ रोजी बेस्ट उपक्रमाने डिजीटल तिकिटासाठी निविदा काढली आहे. १० ऑगस्ट रोजी निविदा पूर्व बैठक झाली. त्यात किमान २० संस्थांनी स्वारस्य दाखविले होते. या निविदेतील पात्रता निकषानुसार फक्त मेसर्स झोपहॉप हीच एकमेव संस्था पात्र ठरत असल्याने या बैठकीत इतर १८ निविदाकारांनी निविदेत सर्वसमावेशक पात्रता निकषांचा अंतर्भाव करण्यासाठी सूचना केल्यात. परंतु सत्ताधाऱ्यांना केवळ झोपहॉप या कंपनीला कंत्राट मिळवून द्यायचे असल्याने राजकीय दबावामुळे प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही असे शिंदे म्हणाले.