मुंबई- मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना कामाच्या आणि घराच्या ठिकाणी ने आण करणाऱ्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यासाठी आज (सोमवार 18 मे) पासून बेस्ट कर्मचारी 'काम बंद, घरी बसा आंदोलन', सुरू करणार आहेत. बेस्ट सेवा बंद ठेवून 100 टक्के लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे बेस्ट कामगारांच्या युनियनचे नेते शशांक राव, रमाकांत बने यांनी सांगितले. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट चालूच राहील अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
...म्हणून बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून 100 टक्के 'लॉकडाऊन' - बेस्ट बस बंद
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे सुमारे 20 हजार रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना ने आण करण्याचे काम बेस्ट उपक्रमाकडून केले जात आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत कोरोनाचे सुमारे 20 हजार रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या पोलिसांना ने आण करण्याचे काम बेस्ट उपक्रमाकडून केले जात आहे. कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचारी, पत्रकार तसेच पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामधून बेस्ट कर्मचारीही सुटलेले नाहीत. आतापर्यंत बेस्टमधील 120 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 50 कर्मचारी बरे झाले आहे. तर 8 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यामुळे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, वैद्यकीय सुविधा द्यावी, कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱयांना 'शहीद' दर्जा द्यावा, कोरोनामुळे मृत पावणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील एका वारसाला नोकरी तातडीने द्यावी, कामगारांना विमा संरक्षण द्यावे आदी मागण्यासाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव, रमाकांत बने यांच्या युनियनचे कर्मचारी आजपासून 'काम बंद, घरी बसा आंदोलन', सुरू करणार आहेत.
अत्यावश्यक सेवेवर परिणाम -
बेस्ट कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यास डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांना रुग्णालयात वेळेवर पोहचणे शक्य होणार नाही. यामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहचण्यास उशीर झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच बेस्ट बसमधून अनेक रुग्ण उपचार करण्यासाठी रुग्णालयात येजा करत आहेत. त्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
बेस्ट सज्ज -
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी बेस्ट प्राशासनाने पर्यायी उपाययोजना केली आहे. बेस्टच्या बसगाड्या कोणत्याही परिस्थिती रस्त्यावर धावणारच आणि अत्यावश्यक सेवा देणारच असा निर्धार बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, जो कामगार कामावर गैरहजर राहिल त्याची अनुपस्थिती लावत पगार कापण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. बेस्टच्या बस गाड्यांना सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. बेस्ट बंद राहिल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून 1200 बसेस मागवण्यात आल्या आहेत.
बेस्टची सेवा सुरूच राहणार !
सध्या संपूर्ण शहरात लॉकडाऊन आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर, पोलीस, डॉक्टर, नर्स आदिना अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत महत्वाची सेवा देण्याचे काम बेस्ट परिवहनच्या बसगाड्या करीत आहेत. असे असताना कर्मचाऱयांमधील काही मंडळी बेस्टची अत्यावश्यक सेवा खंडीत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र बेस्ट प्रशासनाने सोमवारीही अत्यावश्यक सेवेत तत्पर पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्यासाठी बेस्टची बससेवा उपल्बध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी केले आहे.