मुंबई - एमपीएससी परीक्षा न झाल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. विधान परिषदेत याचे जोरदार पडसाद उमटले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आत्महत्या झाली. ५० लाखाची त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, एमपीएससी संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी आक्रमक मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. दरम्यान, अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार भूमिका स्पष्ट करेल, असे स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिले.
एमपीएससी परीक्षा संदर्भात निर्णय घ्या -
रखडलेले एमपीएससी परीक्षांचे निकाल, नोकरी न मिळाल्याने हताश झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी संबंधित उमेदवाराने आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी लिहिलेल्या पत्रात सरकारच्या कार्यपध्दतीवर टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे पत्र परिषदेत वाचून दाखवले. तसेच सरकारच्या बेफिकीरतेमुळे दीड वर्षांपासून अनेक मुले नोकरीत रुजू झालेली नाहीत. सरकारने या मुलांचे भविष्य आणि आयुष्य संपवल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला. सरकारने वेळीच अशा आत्महत्या रोखाव्यात, एमपीएससी परिक्षासंदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी. सभापतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दरकेर यांनी केली.
अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय -
स्वप्नील लोणकर एमपीएससी परीक्षा पास झाला होता. परंतु, न्यायालयाच्या निर्णयामुळे पात्रता असतानाही नोकरीत प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. नैराश्येतून लोणकर या होतकरू तरुणाने आत्महत्या केली. कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत दिले.