मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने आमदार गोपीचंद पडळकर अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर शिरुर कासार (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नुकतेच बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरुर कासार पोलिसांनी विधानपरिषदेचे आमदार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर महेबूब शेख यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. तसेच त्यांची प्रतिमा जाळून निषेध केला होता.
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यात ठिकठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होवून आंदोलन करत आहे. धुळे, औरंगाबाद, नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रसेने गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला आहे.
नेमके काय म्हणाले होते आमदार पडळकर?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे, असे वक्तव्य पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी केले होते.गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे.