मुंबई- कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर उपाययोजना करत असताना केंद्राकडून लसीकरण हाती घेण्यात आलेले आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी कोविन नावाच्या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपवर जाऊन कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांना स्वतःचे नाव रजिस्टर करावे लागत आहे. मात्र, याचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांकडून घेतला जात असून, सध्या ई-मेल, एसएमएस, व्हाट्सअॅपसारख्या माध्यमातून बनावट कोविन लिंक पाठवून आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर येत आहे.
अशी होतेय फसवणूक
कोरोनाची लस घेण्यासाठी आपले नाव रजिस्टर केल्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाची वेळ व दिवस निवडावा लागतो. अशातच लसीचा तुटवडा असल्यामुळे लाखो नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी अडचण येत आहे. यामुळे सध्या सोशल माध्यमांवर व एसएमएस, ई-मेलच्या माध्यमातून बनावट कोविन लिंक पाठवून नागरिकांना सांगितले जात आहे की, 100 ते 200 रुपये ऑनलाइन भरल्यास कोरोना लस तत्काळ मिळेल. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अशा बनावट लिंकच्या माध्यमातून बळी पडणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा प्रकारच्या बनावट लिंकवर एखाद्या व्यक्तीने ने क्लिक केल्यास एक विशिष्ट प्रकारचा मालवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये जाऊन क्रेडिट-कार्ड, डेबिट-कार्ड, बँकिंग व्यवहाराशी संबंधित गोपनीय माहिती सायबर भामट्याकडे पोहोचत आहे. त्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचेही अंकुर पुराणीक यांनी म्हटले आहे.