मुंबई -वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील रखडलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार यासाठी 14 मार्चचा मुहूर्त ठरवण्यात आला होता. मात्र, हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला असून आता 21 मार्चला कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती योगेश म्हसे, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांनी दिली आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने कमी लोकांमध्ये करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. पण एक महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात
चार वर्षे काम रखडलेले
100 वर्षे जुन्या बीडीडी चाळी दुरूस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे याचा शक्य तितक्या लवकर पुनर्विकास होणे गरजेचे होते. त्यानुसार म्हाडाकडे याची जबाबदारी देत राज्य सरकारने पुनर्विकास हाती घेतला. त्यानुसार चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात प्रकल्पाचा नारळ फोडण्यात आला. कंत्राटदाराची नियुक्ती केली. पण अजूनही प्रत्यक्ष बांधकामाला मात्र सुरुवात झालेली नाही. पुनर्विकास रखडला असून रहिवाशांना नव्या घरांची प्रतीक्षा आहे. पण आता मात्र मुंबई मंडळाने पुनर्विकासातील सर्व अडचणी दूर झाल्याचे म्हणत कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 मार्चला कामाला सुरुवात होणार होती. पण आता हा मुहूर्त पुढे ढकलत 21 मार्चला वरळीतील जाबोरी मैदानात कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे म्हसे यांनी सांगितले आहे.
असा असेल पुनर्विकास
वरळी, ना.म. जोशी आणि नायगाव या तीन ठिकाणच्या चाळीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणच्या कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. हा कंत्राटदार पुनर्वसित आणि विक्री इमारतीची उभारणी करणार आहे. तर रहिवाशांना 500 चौ फुटांचे मोफत घर या पुनर्विकासाद्वारे मिळणार आहे. साधारणपणे हा प्रकल्प पूर्ण होण्यास आठ वर्षांचा काळ अपेक्षित आहे. त्याचवेळी म्हाडाला हजारोच्या संख्येने अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. तर ही घरे लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विकली जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प रहिवासी, म्हाडा आणि भविष्यात मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून घर घेऊ इच्छिणाऱ्यासाठी ही महत्वाचा आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने ही मोठी दिलासादायक बाब असणार आहे.
हेही वाचा -धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री