महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीडीडीवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात; आजचे उपोषण तूर्तास मागे - बीडीडीवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात

ना. म. जोशी, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास कामाच्या प्रक्रिया सध्या रखडल्या आहेत. येथील रहिवाशांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने बीडीडीवासीयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

bdd
बीडीडीवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात

By

Published : Dec 28, 2020, 12:34 PM IST

मुंबई- ना. म. जोशी, नायगाव आणि वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास मंदावला आहे. पुनर्विकासातील अनेक प्रक्रिया रखडल्या आहेत. तेव्हा पुनर्विकासाला गती द्यावी, संक्रमण शिबिरात गेलेल्यासाठीची लॉटरी काढावी यासारख्या मागण्यांसाठी आता बीडीडीवासीय आक्रमक झाले आहेत. त्यानुसार त्यांनी आज, सोमवारी लक्षणीय उपोषणाची हाक दिली होती. मात्र पोलिसांकडून याला परवानगी न मिळाल्याने तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र लवकरच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे बीडीडीवासीयांनी सांगितले आहे.

जांबोरी मैदानावर होणार होते आंदोलन

ना.म. जोशी मार्ग येथील 200 हुन अधिक पात्र रहिवाशी वर्षभरापूर्वी संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. पण अजूनही त्यांना पुनर्वसित इमारतीत कुठे घर मिळणार यासाठी काढण्यात येणारी लॉटरी अजूनही काढण्यात आलेली नाही. लॉटरीची केवळ घोषणा झाली. तर पात्रता निश्चिती संथ गतीने सुरू आहे. असेच काम सुरू राहिले तर आम्ही हक्काच्या नव्या घरात कधी जाणार? असा प्रश्न विचारत आता बीडीडीवासीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आज वरळीतील जांबोरी मैदान येथे काही रहिवासी उपोषणाला बसणार होते. मात्र उपोषणाच्या दोन दिवस आधी पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारल्याने आजचे आंदोलन तूर्तास मागे घ्यावे लागल्याची माहिती बीडीडीवासीय कृष्णकांत नलगे यांनी दिली आहे.मात्र, आंदोलन मागे घेतले आहे, रद्द केलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा?

आमच्या आंदोलनाच्या हाकेची दखल स्थानिक आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. त्यानुसार लवकरच ते बीडीडीवासीयांशी चर्चा करणार आहेत, असेही नलगे यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांच्या समोर आम्ही आमच्या सर्व समस्या मांडू. त्यावर काय निर्णय होतो,यावर पुढे नेमके काय करायचे हे ठरवू असेही नलगे यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details