मुंबई - बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. (सन १९२० ते १९२४) या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती. त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून, मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली. या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे सुमारे ९२ एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली.
'प्रतिष्ठित लोक वास्तव्यास होते'
या चाळींमध्ये औद्योगिक कामगार आणि गिरणी कामगारवर्ग प्रामुख्याने राहू लागला. शंभर वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीडीडी चाळींमध्ये अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार, अशी अनेक प्रतिष्ठित लोक वास्तव्यास होते. तसेच, मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा सर्वात मोठा वाटा आहे. शतकपूर्ती झालेल्या या चाळी आज अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आहेत. म्हणून, शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे.
'येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार'
पिढ्यानपिढ्या १६० चौरस फुटाच्या एका बहुपयोगी खोलीत संसार थाटणाऱ्या हजारो रहिवाशांना या पुनर्वसनातून ५०० चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. येथील रहिवाशांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांयुक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे. ज्यामुळे नागरी सुविधांचे नियोजन उत्कृष्ट होण्यास मदत होणार आहे.