मुंबई - वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शासकीय निवास्थानी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
दक्षिण आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प -
दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांनी दिली. वरळी, ना.म.जोशी मार्ग -परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ + 3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. या चाळींचा पुनर्विकास करुन सदरहू चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य व मालकीहक्काने देणे, तसेच या ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मुलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टी धारकांप्रमाणे २६९ चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बी. डी. डी. चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर या योजनेव्दारे १५ हजार ५९३ पुनर्वसन गाळ्याव्यतिरिक्त सुमारे ८ हजार १२० विक्री योग्य गाळे बांधण्यात येणार आहेत.