मुंबई -राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात ( Rajyasabha Election 2022 ) आता सात उमेदवार असल्याने घोडेबाजार होणार, असा तर्क-वितर्क लढवला जातो आहे. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी प्राधान्यक्रमाची मते कुणाला मिळतात, यावरच सहावी जागा निवडून येणार आहे. एकाच पक्षाकडे असणाऱ्या मतांची संख्या पाहिल्यास भाजपाला संधी अधिक असल्याचे जाणकार सांगतात.
राज्यसभा निवडणुकीचे मतदान हे पसंती क्रमाचे म्हणजेच प्रेफरन्शियल मतदान असते. पहिल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावापुढे एक क्रमांक टाकायचा आणि दुसऱ्या तिसऱ्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे दोन आणि तीन क्रमांक टाकायचे, अशा पद्धतीने मतदान करावे लागते. पक्षातील आमदारांसाठी मतदान दाखवून करावे लागते. त्यामुळे पक्षातील मध्ये फुटणार नाही, असा दावा सर्व पक्ष करत आहेत. वास्तविक पक्षाने या निवडणुकीसाठी जरी व्हीप जारी केला तरी विरोधात जाणाऱ्या आमदारावर कारवाई करता येत नाही, असेही म्हटले जाते. त्यातच अपक्ष आमदारांवर मत दाखवण्याची सक्ती नाही, किंबहुना जर त्यांनी मत दाखवले तर त्यांचे मतच बाद होते. त्यामुळे त्यांना मत दाखवणे बंधनकारक नाही आणि तिथेच दगाफटका होऊ शकतो. घोडेबाजाराला वाव आहे, असे म्हटले जाते.
काय असते मतांची प्रक्रिया? - राज्यसभेच्या उमेदवाराला निवडून येण्याकरिता 42 मतांचा कोटा ठरला आहे. मात्र, ही 42 मते म्हणजे या मतांचे मूल्य 4200 इतके आहे. एका मताला शंभर मूल्य दिलेले आहे. जर, एखाद्या उमेदवाराला 4200 पेक्षा कमी मूल्य असेल, तर त्याला ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या फेरीत झगडावे लागते. सहा उमेदवार निवडून येणार असल्याने सातवा उमेदवार बाद होईपर्यंत, या फेर्या सुरू राहतात, अशी माहिती ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी दिली.
पसंती क्रमाच्या मतांचे महत्व -जेव्हा नियोजित जागांपेक्षा मतदार अधिक असतात, तेव्हा मतमोजणीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होते दूसर्या आणि तिसर्या पसंतीची मते मोजली जाऊ शकतात. सात उमेदवारांमध्ये ज्या उमेदवाराला सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते पडतात तो प्रथम विजयी घोषित होतो. त्याची दुसऱ्या पसंतीची मते आधी मोजली जातात. म्हणजे एखाद्या उमेदवाराला सर्वाधिक 60 मते असतील तर तो सर्वात प्रथम विजयी घोषित होतो. तसेच, त्याची उर्वरित 18 मते ही 100% मूल्याने दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला वर्ग केली जातात. उदाहरणार्थ संजय राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आणि दुसऱ्या पसंतीची मते जर संजय पवार यांना अधिक असतील तर ती मते त्यांच्याकडे वर्ग केली जाऊ शकतात. मग, संजय पवार पुढे येऊ शकतात, असेही जोशी म्हणाले.