मुंबईगणपती बाप्पाची जेवढी विविध रूपे तेवढ्याच त्याच्या रंजक कथा. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन देशभरात मागील अनेक वर्षापासून केले जात आहे. महत्त्वाचं म्हणजे अनेकभक्तगण त्याला चांगला प्रतिसादही देत आहेत. असेच एक पिळणकर कुटुंब (Pilankar family) आहे, जे मागील ७६ वर्षापासून घरात उजव्या सोंडेच्या बाप्पाची स्थापना (Bappa of Right trunk) करून पूजा अर्चा करत आले आहेत. दरवर्षी विविध चलचित्रांच्या माध्यमातून पौराणिक देखावे सादर केले जातात. विशेष म्हणजे या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जात नाही. दरवर्षी एकच मूर्ती गणेश चतुर्थीला पुजली जाते व अनंत चतुर्थीला उत्तर पूजा करून पुन्हा येणाऱ्या संकष्टीला त्याची मंदिरात स्थापना केली जाते. व ही परंपरा अखंड नित्यनियमाने मागील ७६ वर्षापासून सुरू (76 years of tradition) आहे.
काय आहे मागचा इतिहास ?या गणपती बाप्पाच्या मुर्तिविषयी बोलताना पिळणकर कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे कर्ते ज्यांच्या घरी आता गणपती बाप्पा विराजमान होतात, ते दिलीप मधुसूदन पिळणकर सांगतात की, १९४६ साली त्यांचे आजोबा सीताराम पिळणकर यांना ही मूर्ती मे महिन्यात मुंबईला, दादर येथे समुद्रात पोहताना भेटली. ते स्वतः पुजारी असल्याकारणाने त्यांनी ती मूर्ती त्या वर्षी घरी आणली. त्यावर्षी गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना करून अनंत चतुर्थीला त्याचे विसर्जन करायचे त्यांनी ठरवले, अशा पद्धतीने त्यांनी त्या वर्षी पूजा अर्चा केली व त्यावर्षी दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्थी असताना आदल्या दिवशी त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की, "मी तुला बाहेर पाण्यात सापडलो आहे, पुन्हा मला बाहेर सोडू नको! मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त माझी पूजाअर्चा कर," असा दृष्टांत त्यांना झाला व तेव्हापासून ह्या मूर्तीची पूजा दरवर्षी नित्य नियमाने होत आली आहे.
सिताराम पिळणकर यांच्यानंतर त्यांचा मुलगा मधुसूदन पिळणकर व आता मधुसूदन यांचा मुलगा दिलीप पिळणकर या तिसऱ्या पिढीकडे गणपतीची स्थापना केली जाते. अतिशय भक्ती भावाने दरवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण पिळणकर कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा करण्याबरोबरच इथे चल चित्राच्या माध्यमातून दरवर्षी विविध पौराणिक कथांचे देखावे सादर केले जातात. जय गणेश भक्तांना मोठ्या प्रमाणात आवडतात.