मुंबई -बँक ग्राहकांचे विश्वासाने जमा केलेले 1 कोटी 85 लाख रुपये ( Bank manager Rs 1.85 crore on online gambling ) दादर येथील खासगी बँकेच्या उप शाखा व्यवस्थापकाने ऑनलाइन सट्ट्यावर उडवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. आरोपीने खोट्या व्यवहाराच्या नोंदी करून सट्टेबाजांच्या 9 बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली. कागदपत्रांच्या तपासणीत बँक नोंदीमध्ये दादर शाखेमध्ये अधिक रोख रक्कम असल्याचे दिसून आले. पण प्रत्यक्ष तपासणीत 1 कोटी 85 लाख रुपये कमी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी उप शाखा व्यवस्थापकाचे बिंग फुटले
बँकेचे विभागीय प्रमुख राजीव लंगर यांनी याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बँकेचा उप शाखा व्यवस्थापक विशाल सदाशिव गुरूड (31) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो 2012 पासून बँकेत कार्यरत आहेत. बांद्रा येथील बँकेच्या चलन तपासणी विभागाने दादर शाखेत दोन कोटी पाच लाख 16 हजार ऐवढी रोख रक्कम का ठेवली आहे? याबाबत विचारणा केली होती. त्यावर तपासणी केली असता बँकेत केवळ 29 लाख 16 हजार एवढीच रोख रक्कम असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार लंगर हे 6 नोव्हेंबर 2021 मध्ये बँकेच्या दादर शाखेत गेले असता त्यांना तेथील शाखा व्यवस्थापक भेटून याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विशाल गुरूड याची चौकशी करण्यात आली.