मुंबई - गुंगीचे औषध टाकलेला चहा देऊन सहप्रवाशाला बेशुद्ध करून चोरी करणाऱ्या २५ वर्षीय आरोपीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव हमीद खान असे आहे.
हे ही वाचा - राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री किंवा आयुक्त बदलावर चर्चा नाही -जयंत पाटील
राजस्थानमधील बिकानेर येथील आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी दीपक शर्मा यांनी ९ मार्चला वांद्रे टर्मिनस येथून जाणाऱ्या वांद्रे ते बिकानेर गाडीचे आरक्षण केले होते. शर्मा चालू तिकीट खिडक्यांच्या समोरील एका हॉलमध्ये बसले असता एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि विचारपूस करू लागला. तेव्हा आपण राजस्थानला जात असल्याचे शर्मा यांनी सांगितले. गाडी येण्यास वेळ असल्याचे सांगत त्या व्यक्तीने शर्मा यांना चहा पिण्याचा आग्रह केला. हॉलबाहेरील चहाच्या दुकानाकडे दोघे गेले आणि तेथे त्यांनी चहा घेतला. ते दोघेही चहा पिऊन पुन्हा हॉलमध्ये परतले. तेव्हा शर्मा बेशुद्ध पडले. तोपर्यंत त्यांच्याजवळील मुद्देमाल त्या व्यक्तीने लंपास केला होता. वांद्रे टर्मिनसवर तैनात पोलिसांना शर्मा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसताच त्यांना तात्काळ भाभा रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने शुद्धीवर आलेल्या शर्मा यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली.
प्रवाशांना लुटणाऱ्या आरोपीस अटक हे ही वाचा - सचिन वाझे प्रकरण समोर करून, डेलकर प्रकरण दाबण्याचा भाजपचा डाव - पटोले
पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कुर्ला येथे राहणाऱ्या हमीद खानला पकडले. त्याच्याकडे २ लाख ८ हजार रुपये किमतीचे १३ मोबाइल आणि अन्य मुद्देमाल सापडला. गुंगीच्या २० गोळ्या आणि पाच ते दहा गोळ्यांची पावडरही सापडली. खान हा प्रवाशांचा विश्वास संपादन करून त्यांना चहामध्ये गुंगीचे औषध टाकून देत होता व नंतर सर्व मुद्देमाल घेऊन पसार होत असे. त्याच्यावर अन्य काही गुन्हे आणि यात त्याचे साथीदार आहेत का, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले.