मुंबई -मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आता जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या एकमेव भूमिगत रेल्वे स्थानकासाठी एनएचएसआरसीएलने आता पॅकेज सी वन अंतर्गत ( Bandra Kurla Complex Underground Station ) निविदा जाहीर केल्या आहेत. या रेल्वे स्थानकात सहा प्लॅटफॉर्म असणार आहे. तर प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 415 मीटर असणार आहे. 16 डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी ही लांबी पुरेशी असणार आहे, तर या रेल्वेस्थानकाला जोडणाऱ्या मेट्रो आणि रस्त्यांसाठीही निविदा काढण्यात आली आहे.
एकमेव भूमिगत रेल्वे स्थानक :वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एचएसआर स्टेशन हे मुंबई अहमदाबाद एचएसआर कॉरिडोरवरील एकमेव भूमिगत रेल्वे स्थानक असणार आहे. या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर नियोजित आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म कोर्स आणि सर्विस फ्लोर असे तीन मजले असणार आहेत. स्थानकाचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे, की प्रवाशांच्या हालचाली आणि सोयीसुविधांसाठी कम कोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरावर पुरेशी जागा उपलब्ध असणार आहे.