महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'लोकमान्य व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेतून पुन्हा स्वराज्यासाठी लढा द्यावा लागणार'

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी लागणार आहे. या प्रेरणेतूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर कार्य करणाऱ्या केंद्रातील लोकविरोधी भाजप सरकारविरूद्ध पुन्हा स्वराज्याच्या लढा द्यावा लागणार असल्याचे बाळासाहेब थोरातांनी सांगितले.

लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करताना बाळासाहेब थोरात
लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करताना बाळासाहेब थोरात

By

Published : Aug 1, 2020, 7:15 PM IST

मुंबई - लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी लागणार आहे. या प्रेरणेतूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर केंद्रातील लोकशाहीविरोधी भाजप सरकार काम करते. या सरकारविरोधात पुन्हा स्वराज्याच्या लढा द्यावा लागणार असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त माध्यमांशी बोलत होते.

लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला. लोकांमध्ये अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. पुढे ते म्हणाले, की हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी धर्मांध, जातीयवादी, हुकुमशाही विचारांच्या भारतीय जनता पक्षाविरोधात संघर्ष करावा लागणार आहे. हीच लोकमान्य टिळक व लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली ठरणार आहे.

सर्व जाती-धर्माच्या व वर्गांच्या लोकांना एकत्रित करून लोकमान्यांनी स्वराज्यासाठी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला. अण्णाभाऊ साठे यांनी गरीब, कष्टकरी, पीडित यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिल्याचे थोरात यांनी म्हटले.

लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारीत लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशनही थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी व लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी चेंबूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त लोकशाहीरांना अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details