मुंबई - जगभरामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला असून त्याचा प्रसार वेगाने होत आहे. यातच महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची वाढ होत असल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी घालावी. तसेच येणाऱ्या प्रवाशांना आयसोलेट करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी टि्वटद्वारे केली आहे. एका वृत्तपत्रातील बातमीचा हवाला देत, विमान वाहतुकीवर बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली.
अनेक देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या काही भागांमध्ये पुन्हा 30 डिसेंबरपर्यंत लॉकडाउन घोषीत केला आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या प्रसारामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. त्यामुळे यूरोपीय यूनियनच्या काही देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी आणली आहे. फ्रान्स, जर्मनी, ईटली आदी देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या फ्लाइटवर बंदी लावली आहे.