मुंबई -लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. यानंतर रिक्त झालेल्या पदावर आज (शनिवार) काँग्रेसने मराठा नेते म्हणून ओळख असलेल्या बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती करण्यात आल्याचे दिल्ली येथून जाहीर केले आहे.
अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागेल, असा अंदाज ईटीव्ही भारतने सुत्रांच्या आधारे २ जुलैच्या बातमीतवर्तवला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला.
बाळासाहेब थोरात यांच्या सोबतच राज्यात विविध समाजाचे प्रतिनिधित्व मिळावे आणि सामाजिक समतोल राखला जावा, यासाठीची पुरेपूर काळजी काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसने थोरात यांच्यानंतर प्रदेश कार्याध्यक्षपदी पाच जणांची नियुक्ती केली आहे. त्यात प्रामुख्याने माजी मंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील, पश्चिम महाराष्ट्रातील तरुण नेते विश्वजीत कदम, काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या यशोमती ठाकूर आणि अल्पसंख्याक समाजाचे नेते मुजफ्फर हुसेन या पाच जणांची प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. त्यापूर्वी त्यांच्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीने मंजूर केला होता. त्यामुळे राज्यात नवीन प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार वर्षा गायकवाड, नितीन राऊत, आणि विदर्भातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, आज काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, तर त्यांचे भाचे सत्यजित तांबे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. मामा-भाचे काँग्रेसला तारणार का? दोघे मिळून काँग्रेसला नवी उभारी देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बाळासाहेब थोरात यांची थोडक्यात माहिती -
- महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मोठे नेतृत्व
- राज्यमंत्रिमंडळात त्यांनी महसूलमंत्री पद सक्षमपणे सांभाळले
- महसूल विभागाला हायटेक करत लिम्का बुक ऑफ रेकॉरेड मध्ये नोंद
- कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, पाटबंधारे अशी विविध खाती सक्षमपणे त्यांनी सांभाळली आहे.
- मोठा जनाधार असलेले नेते
- १९८५ पासून सलग ७ वेळा विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी
- काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ घरणे
- स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात आणि डॉ. आण्णासाहेब शिंदे यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू
- यशवंतराव चव्हाणांचे वारसदार अशी ओळख
- सहकार, शिक्षण, कृषी, पर्यावरण, ग्रामीण विकासात मोठे काम
- गुजरात विधानसभा निवडणुकीत निवड समितीचे अध्यक्ष, हिमाचल प्रदेशचे निरीक्षक म्हणून काम
- काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रभागी नाव