महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 5, 2021, 3:38 PM IST

ETV Bharat / city

कोरोनाबाधित आरोपीच्या जामिनाचे पैसे पोलिसांनीच भरले

कोरोनाबाधित आरोपी पळून गेल्यामुळे कोरोना संक्रमण अधिक वाढू नये म्हणून खुद्द कांदिवली पोलिसांनी या आरोपीच्या जामिनाचे पैसे भरल्याचे समोर आले आहे.

पोलीस स्टेशन
पोलीस स्टेशन

मुंबई - घरफोडी केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या करीम खान उर्फ पाव या आरोपीला कांदिवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर त्याला क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले होते. मात्र, क्वारंटाइन सेंटरमधून सलग दोन वेळा हा आरोपी पळून गेल्यामुळे कोरोना संक्रमण अधिक वाढू नये म्हणून खुद्द कांदिवली पोलिसांनी या आरोपीच्या जामिनाचे पैसे भरल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी बांद्रा ते बोरवली दरम्यानच्या अनेक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या करीम खान या आरोपीस पकडले होते. अटकेनंतर या आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असता तो कोरोना संक्रमित आढळल्यामुळे त्यास कांदिवली परिसरातील साईनगर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र या क्वारंटाइन सेंटरमधून हा आरोपी पळून गेल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तो त्याच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळताच आरोपीच्या पत्नीला तो येताच याची सूचना पोलिसांना करण्यास पोलिसांकडून सांगण्यात आले होते. आरोपी करीम खान हा त्याच्या घरी पोहोचताच त्याच्या पोलिसांना याची माहिती देऊन त्यास पुन्हा अटक केली होती. यानंतर या आरोपीस पुन्हा एकदा जे जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले होते. जेजे रुग्णालयातील क्वारंटाइन सेंटरमध्ये या आरोपीला ठेवण्यात आलेले असता रविवारी तो अचानक गायब झाला. यानंतर पोलिसांनी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे याची सूचना मुंबईतील सर्व पोलीस ठाण्याला दिली असता बांद्रा पोलिसांकडून या आरोपीला घरफोडी करत असताना अटक करण्यात आली.

दरम्यान, या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने 5 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनाचे पैसे भरण्यास असमर्थ असलेल्या करीम खानने जामिनाचे पैसे भरू शकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. मात्र, कोरोना संक्रमित असलेला हा आरोपी सतत क्वारंटाइन सेंटरमधून पळून जात असल्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याच्या भीतीमुळे कांदिवली पोलीस ठाण्याकडून त्याच्या जामिनाचे पाच हजार रुपये भरण्यात आले. दरम्यान, हे पैसे एका व्यक्तीकडून नाव उघड न करण्याच्या अटीवर देण्यात आल्याचं कांदिवली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details