मुंबई - केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धा आयोजित (Central Government organized Swachh Survey 2021 competition) करण्यात आली होती. या मध्ये, चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत, घनकचरा व्यवस्थापनातील 'नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी' साठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगर पालिकेला( Award to Mumbai Municipal Corporation)प्रदान करण्यात आला आहे.
पालिकेला पुरस्कार -
नवी दिल्ली मध्ये विज्ञान भवन येथे आज (दिनांक २० नोव्हेंबर २०२१) झालेल्या समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ ७) भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे अभिनंदन केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याकडून दर वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा सन २०२१ च्या स्पर्धेत, ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या श्रेणीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपले वर्चस्व पुन्हा दाखवून दिले.