मुंबई -फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो मुंबईतील भेंडी बाजारातील रस्त्यांवर लावून भ्याड निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे कृत्य देशद्रोही आहे. रझा अकादमी कार्यकर्त्यांना तात्काळ अटक करून अकादमीवर बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले की, फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. चीनकडून होत असलेल्या कुरघोड्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या भारताच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या फ्रान्सच्या पंतप्रधानाविरोधात महाराष्ट्रात रजा अकादमीचे लोक निषेध करत आहे. या संदर्भात शिवसेनेची भूमिका काय आहे, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगावे, असा प्रश्नही भातखळकर यांनी केला आहे. चीनमध्ये मुस्लिम समाजावर इतके अत्याचार होत असताना रजा अकादमी गप्प का होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशविरोधी कृत्य व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रजा अकादमी वर बंदी घाला, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या 'रझा अकादमी'वर बंदी घाला
फ्रान्समध्ये नेमके काय घडले?
आठवडाभरापूर्वी फ्रान्समधील एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना घडली. विद्यार्थ्यांना प्रेषित महंमद पैगंबर यांची व्यंगचित्र दाखवून त्याविषयावर चर्चा घडविल्यामुळे पॅरिसमध्ये एका इतिहासाच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी १८ वर्षीय चेनेन या संशयित आरोपीला गोळ्या झाडून ठार केले. यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याला इस्लामिक दहशतवाद असे म्हटले. हा दहशतवाद आपले भविष्य हिरावून घेण्याच्या विचारात आहे. मात्र हे कधीच होणार नाही, अशी त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. यानंतर इस्लामिक देश आणि फ्रान्स यांच्यामधील वाद वाढत असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. त्यानंतर मॅक्रॉन यांनी महंमद पैगंबरांच्या व्यंगचित्रांवर बंदी घालण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले. फ्रान्सच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानावरून अनेक मुस्लिम देशांनी यावर आक्षेप घेतला.
फ्रान्सविरोधात जगभरात मुस्लिम संघटनांकडून आंदोलने-
जगात अनेक ठिकाणी मुस्लिम संघटनांकडून फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यात 28 आणि 29 नोव्हेंबरला मुंबईतदेखील मुस्लिम संघटना रजा अकादमी कार्यकर्त्यांनी आंदोलन करत फ्रान्सविरोधात घोषणा दिल्या व विरोध केला. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.