मुंबई- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर शासकीय कामकाजापासून दूर राहिलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी समोर आले. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजेरी लावणार की दांडी मारणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, राठोड यांनी मंगळवारी केलेल्या शक्तीप्रदर्शनावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
वनमंत्री संजय राठोड यांची आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी की दांडी? - Cabinet meeting
पूजा चव्हाण प्रकरणामुळे चर्चेत आलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी समोर आले. पोहरादेवी येथे त्यांच्या समर्थकांनी केलेले शक्तीप्रदर्शन आणि त्यामुळे कोरोना नियमांची झालेली पायमल्ली यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर आज होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला वनमंत्री राठोड उपस्थित राहाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने चर्चेत
पूजाच्या आत्महत्या याप्रकरणी भाजपने वनमंत्री संजय राठोड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तब्बल वीस दिवसांहून अधिक काळ गायब झालेले संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी इथे समोर आले. तिथे आपली बाजू मांडल्यावर वनमंत्री राठोड यांनी पालकमंत्री या नात्याने यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. मात्र पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे पुन्हा गोत्यात आले आहेत. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. या आदेशाची देखील राठोड यांनी शक्तिप्रदर्शन करून पायमल्ली केली. हे शक्तिप्रदर्शन त्यांना चांगलंच भोवण्याची चिन्हे आहेत. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचीही प्रतिमा यामुळे मलीन होत असल्याचे बोलले जात आहे. नाराजी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र थेट पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ३ फेब्रुवारीपासून मंत्रालय आणि शासकीय कामकाजापासून राठोड दूर होते. या काळात त्यांनी मंत्रिमंडळाच्या २ बैठकांना गैरहजेरी लावली. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला तरी राठोड हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.