मुंबई -विधानसभेच्या अध्यक्षपदाची (Assembly Speaker Election) निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच (Winter Session 2021) होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress President Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. ते आज मुंबईत बोलत होते. 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत हे हिवाळी अधिवेशन होणार आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नसल्याचंही यावेळी नाना पटोले म्हणाले आहेत.
- 22 ते 28 डिसेंबरला दरम्यान होणार हिवाळी अधिवेशन -
विधानसभा अध्यक्षाची निवडणूक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात व्हावी. यासाठी काँग्रेस (Congess Insistent For speaker post election) आग्रही आहे. 22 ते 28 डिसेंबरला मुंबई हिवाळी अधिवेशन होणार असून पहिल्या आठवड्यात 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी कामकाज चालणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर हे दोन दिवस कामकाज चालणार आहे. या पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
- अमरावती दंगलीसंदर्भात भाजप नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य-
अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते. भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केलीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असेही पटोले म्हणाले.