मुंबई- नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार संग्राम थोपटे, के. सी. पडवी यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. दिल्लीमध्ये संग्राम थोपटे आणि के सी पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे थोपटे राजकीय विरोधक मानले जातात. तर शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार आहेत.
या नावांची चर्चा नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार असताना विधानसभेचे अध्यक्षपद ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले पुण्याचे आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे. यातही संग्राम थोपटे, नितीन राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जास्त चर्चा आहे.
दिल्लीतून संग्राम थोपटेंच्या नावाला पसंती -
संग्राम थोपटे यांच्या नावाची या पदासाठी सर्वाधिक चर्चा होत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. २००९ पासून सातत्याने ते या मतदारसंघातून निवडूण येत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे ते चिरंजीव आहेत. शरद पवार आणि थोपटे घरण्याचे पारंपरिक विरोधक मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना विरोध असल्याचे समजते. मात्र दिल्लीतील काँग्रेस हायकमांड कडून थोपटे यांच्या नावाला पसंती आहे.
बाळासाहेब थोरात यांचे नाव ही चर्चेत-
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारात दोन वेळा राज्यमंत्री आणि चार वेळा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणारे ज्येष्ठ नेते, सध्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत संवेदशील व मितभाषी नेतृत्व. दिल्लीच्या हायकमांडचे अत्यंत विश्वासू नेते आहेत. विखे - पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर थोरात यांनी पक्ष बांधणीवर भर दिला. थोरात यांचे त्यामुळे नाव अध्यक्ष पदाच्या चर्चेत आहे. बाळासाहेब थोरात यांची अध्यक्षपदी निवड केल्यास महसूल मंत्री पदासाठी काँग्रेसला नवा चेहरा द्यावा लागेल.