मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुर शहरातील नागपूर विद्यापीठात आता संघाने राष्ट्रनिर्माणासाठी नेमके काय केले, यासाठीचे धडे शिकवले जाणार आहेत. विद्यापीठाच्या बी.ए. या पदवीच्या भाग-२ च्या इतिहासातील अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय स्वंयसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका' हे प्रकरण शिकवले जाणार असल्याने त्याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासाठी एक ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात त्यांनी संघाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका शिकवत असताना संघाने १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला केलेला विरोध, भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाला केलेला विरोधही विद्यार्थ्यांना सांगावा अशी आमची मागणी असल्याचे चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. चव्हाण यांच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सगळ्यात मोठी विभाजनकारक शक्ती आहे. या संघटनेचा इतिहास हा पूर्णपणे काळा असून तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्यक आहे. ब्रिटीशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाचा केलेला विरोध, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यापासून इच्छुक स्वयंसेवकांना परावृत्त करणे, १९४२ चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटीशांना केलेली मदत हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतिक आहेत. स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीमध्ये संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंड्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वतःच्या कार्यालयावर न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे. गेली अनेक वर्ष देश धर्मनिरपेक्ष असताना हिंदू राष्ट्राची प्रार्थना खुलेआमपणे केली जाते. खऱ्या अर्थाने जर विद्यार्थांना आरएसएसची माहिती द्यायची असेल तर त्यांच्यावर तीनदा बंदी का घातली गेली? हा अभ्यासक्रमही त्यांनी शिकवावा अशी कोपरखळी चव्हाण यांनी मारली. सत्तेचा गैरवापर करुन संघाची कितीही भलामण करण्याचा प्रयत्न केला तरीही सत्य लपणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावात आणि जन्मतारखेत करण्यात आलेला गोंधळ समोर आला होता. त्या पार्श्वभूमीर नागपूर विद्यापीठातील पदवीच्या अभ्यासक्रमाचे हे प्रकरण समोर आल्याने येत्या काळात नागपूर विद्यापीठातील संघाच्या भूमिकेच्या या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.