मुंबई -अशोक चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात एका पित्याने नव्याने विकत घेतलेल्या गाडीचे पुजन, आपल्या चिमुकल्या कन्येच्या पायाचे ठसे कुंकुवात भिजवून गाडीच्या बोनेटवर उमटवत केले होते. हा व्हिडिओ अशोक चव्हाण यांनी पाहिला आणि त्यांना तो इतका भावला की, तो व्हिडिओ त्यांनी ट्विट केला. यासोबतच त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
हेही वाचा... 'सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाला लगेच सुरुवात करणार'
अशोक चव्हाण यांनी काल मंगळवारी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आलेला एक टिकटॉकचा व्हिडिओ ट्वीट केला होता. हा व्हिडिओ मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या नागेश पाटील यांचा होता. दोन आठवड्यांपूर्वीच नागेश यांनी नवीन वाहन खरेदी केले. त्यावेळी त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून, लक्ष्मीची पावले म्हणून त्याची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती. लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा, हा व्हिडिओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ ट्वीटर आणि फेसबुकवर शेअर करत, एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या.
अशोक चव्हाण यांची ही ट्विटर व फेसबुकवरील पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. यानंतर हा टिकटॉक व्हिडीओ तयार करणारे नागेश पाटील यांच्यापर्यंत ती पोहोचली दोखील. रात्री उशिरा मग नागेश यांनीही ट्विटरवरून अशोक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले. तसेच वेळ काढून छोटासा कॉल करण्याची विनंती केली.
अशोक चव्हाण यांनी बुधवारी सकाळी नागेश यांचा तो ट्वीट पाहिला. यानंतर आज सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयात बसण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे कार्यालयात पूजा करून स्थानापन्न झाल्यानंतर, अशोक चव्हाण यांनी पहिलाच फोन नागेश पाटील यांना लावला. तसेच त्यांची, त्यांच्या कन्येची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर कोल्हापूर किंवा पुण्याला आल्यावर नक्की भेटू, असे आश्वासनही दिले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी गृहमंत्री असलेले, शंकरराव चव्हाण यांचे अशोक चव्हाण हे पुत्र आहेत. अशोक चव्हाण हे देखील दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते. सध्या ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदावर कार्यरत आहेत. अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया या नावाच्या दोन मुली आहे. त्यांच्या दोन्ही मुली उच्चशिक्षीत आहेत. सुजया यांनी लोकसभेच्यावेळी आपल्या वडिलांसाठी प्रचार देखील केला होता.
अशोक चव्हाण यांचे कुटुंब, मुलगी श्रीजया आणि सुजया...